ओव्हर द टॉप

जरा ओव्हर द टॉप वाटतंय
अस एका वाक्यात
एक केलेल्या दिवस-रात्रींचे
अस्तित्व तू नाकारलेस
तेंव्हा मी गप्प राहिलो

काही दु:ख असतातच तशी
थोडीशी ‘ओव्हर द टॉप’
आणि ते बरेच आहे
उतरली खाली जर ती तर
जातील थेट काळजाच्या आरपार

काही दु:ख नसतात
उच्चब्रू, शालीन वगैरे
नियम पाळणारी, सुसंस्कृतपणाचे
चाकोरीत रहाणारी

काही दु:ख असतात हेकेखोर
बलप्रदर्शन करणारी, उगीचच
कुठेही कपडे काढून आपले
निरागस नग्नत्व मिरवणारी

त्या दु:खांच्या कथा
शब्दांनाच पागळे करतात
पाळमूळं उखडतात
सर्जनशीलतेच्या संकेतांची

ती तर असतातच मस्तवाल
पण बनवतात आम्हालाही
मस्तवाल, काही क्षण
त्या निसटत्या सोबतीचे

व्यावसायिक तटस्थता जपणाऱ्या
तुझ्यासारख्या टिकेकराला
दिसतो फक्त तो वेश, तो आवेश
पण तो वेश असतो त्या नग्नतेला
थोड़ स्वीकार्य बनवण्यासाठी
तुझ्या ‘सुसंस्कृत’ समाजासाठी

तू पण फसतोस त्या दिखाव्याला
आणि अस्सल गावरान दुःखाला
सुटाबुटातला साहेब समजून तोलतोस
त्त्याच कर्जाने आणलेल्या मापदंडाने

म्हणूनच मी गप्प राहतो
कारण तुझ्या कर्जाऊ मापदंडाचे हप्ते
तुला असेंच तर फेडावे लागणार
मी मात्र त्या मापदंडाप्रमाणे
त्या दु:खांना कुठे बांधू?
त्यांना जाउदे ‘ओव्हर द टॉप’
मी थोडा छोटा झालोच त्यामध्ये
तर होउदे
ती दु:खं तरी मोठी होतील

आणि मी पण मोठा झालोच आहेकी
त्यांचा व्यवसाय करत
माझा मोठेपणाही कर्जाउच आहे ना?

Advertisements

रोखठोक – सत्यदेव दुबे

साप्ताहीक सकाळच्या २००७ दिवाळी अंकातील माधव वझे यांनी घेतलेली सत्यदेव दुबे यांची मुलाखत झकास आहे.

“मी युजिनिओ बार्बाचा एक लेख वाचला आहे. This is all bullshit! त्यांना तिकडे पश्चिमेकडे डोक्याला शांती पाहिजे. Acting ला तर अशांत माणूस पाहीजे. That is why you should act in a play. Acting केल्यावर मग शांती. ते लोक काय बोलतात ते निरर्थक आहे”

पश्चिमेकडून आले म्हणजे बरोबर अशी आजकाल एक धारणा होऊन बसली असताना, हे मला फारच आवडले.

“प्रेक्षकांनापण मला सांगायचे आहे, की तुम्हीही सरेंडर करायला शिकले पाहीजे. हे आवडले, ते नाही आवडले, हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहेच; पण अनुभव घेताना स्वतःला सोडून द्या. नाहीतर it is like sex. It can’t haapen. Sex चे उदाहरण दिलेकी आपल्याला लवकर समजत. म्हणून तीच analogy वापरून मी म्हणतो, problem with acting is the same as it is with sex; people only talk”

हाहा. पण तथ्य आहे! एकूणच वाचनीय मुलाखत.

यापुढे थांबू नको तू

(कवी: बा. भ. बोरकर )

यापुढे थांबू नको तू; आपुल्या वाटा निराळ्या;
वाढत्या संध्येत माझ्या सावल्या वाटेत आल्या!

चांदणे भोगून झालॆ; सावल्यांची ओढ आता
मैफली गाउन झाल्या; मौन झाले गोड आता!

लौकिकी रंगुन जा तू, और त्याला वर्ख आहे
लौकिकापल्याडच्या त्या अद्‌भुती मी गर्क आहे!

पावसाचे शैत्य येथे, काजव्यांची लख्ख झाडे;
गर्द कालेखातसुद्‍धा चित्त चाकाटे उजेडे!

जा कुठेही, जा कसाही; शेवटी येशील येथे
वाकडी वा वाट वेडी या इथे विश्राम घेतॆ!

(मी केलेले स्वैर इंग्रजी भाषांतर: http://asuph.wordpress.com/2005/09/21/the-destination/)

मी पण मराठी!

अतुल सबनीसनॆ वर्डप्रेसमधे मराठी language category आणली आणी मला विचारले की थोडे भाषांतर करशील का. आता विषयांतर करायची सवय असलेल्या मला त्यातूनच कल्पना सुचली की मराठी blog च चालू करून टाकूया त्या नादाने. नाहीतरी मराठी लिहीणे होते कोठे आजकाल?

तर आता हे पानही आपण भरवणार!

मी पण मराठी…